Tuesday, 11 April 2017

महाराष्ट्र पोलिस तक्रार प्राधिकरण मुंबईत

पोलिसांच्या मनमानीला चाप!


Maharashtra Times |
Updated Nov 30, 2016,
08.31AM IST

अॅड. लिंबाद्री विठ्ठल बोम्मेर

पोलिसांच्या मनमानी वागणुकीचा, बेकायदा-गुन्हेगारी कृत्यांचा प्रश्न वर्षानुवर्षे अनुत्तरीत आहे. आता महाराष्ट्रात लवकरच पोलिसांविरुद्धच्या तक्रारींचे गतीने निवारण करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस तक्रार प्राधिकरण मुंबईत सुरू होत आहे. शिवाय सहा विभागीय प्राधिकरणेही पुढच्या काही महिन्यांत सुरू होणार आहेत.


पोलिसांनी तरुणाला बेकायदा डांबून ठेवले, कोठडीत झालेल्या छळवणुकीत आरोपीचा मृत्यू, एफआयआर घेण्यास नकार दिल्याने तक्रारदाराची फरफट, पोलिसांकडूनच मॉडेलवर बलात्कार, तक्रारदार महिलेचा लैंगिक छळ, गुंडांवर कारवाई करण्याऐवजी तक्रारदाराचाच छळ, पोलिसांकडून तक्रारदाराला मारहाण, अशा अनेक बातम्या आपण वाचत असतो. वास्तविक ज्यांनी कायद्याचे रक्षण करायचे त्यांच्याकडूनच बेजबाबदार व गुन्हेगारी स्वरुपाचे वर्तन होत असल्याचे दिसल्यानंतर त्यांच्यावर तुलनेने अधिक कठोर कारवाई होणे अभिप्रेत असते. परंतु, प्रत्यक्षात अनेक प्रकरणांत सरकारकडून व पोलिस विभागाकडून अशांना एक तर अभय मिळत असल्याचे किंवा कारवाईचा निव्वळ दिखाऊपणा होत असल्याचे चित्र दिसते. त्यामुळे त्यांना देशाचा कायदा लागूच होत नाही, अशा पद्धतीची भावना सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होते.

हे प्रश्न फार पूर्वीपासून निर्माण होत होते. म्हणून केंद्र सरकारने पोलिस व्यवस्थेतील सुधारणांसाठी वेळोवेळी आयोग व समित्या नेमल्या होत्या. असाच एक राष्ट्रीय पोलिस आयोग केंद्र सरकारने १५ नोव्हेंबर १९७७ रोजी नेमला होता. या आयोगाने १९७९मध्ये आपला पहिला अहवाल दिला होता. त्यात पोलिसांविरुद्धच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक स्वतंत्र प्राधिकरण असण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती. हीच बाब रिबेरो समितीने १९९८मध्ये तर पद्मनाभय्या समितीने २०००साली मांडली. कारण सद्यस्थितीत पोलिसाच्या बेजबाबदार वा बेकायदा वर्तणुकीची तक्रार करायची झाल्यास नागरिकांना एक तर पोलिस विभागाकडे, न्यायालयात किंवा महिला आयोग अथवा राष्ट्रीय-राज्य मानवाधिकार आयोगाकडे जावे लागते. पोलिस विभाग व सरकारी यंत्रणेकडून अशा तक्रारी अनेकदा गांभीर्याने घेतल्या जात नाहीत. तर आयोगांना केवळ सरकारकडे कारवाईची शिफारस करण्याचे अधिकार असल्याने तेही प्रभावी ठरताना दिसत नाही. न्यायालयांवर प्रलंबित खटले व प्रकरणांमुळे आधीच ताण असताना अशा तक्रारींची तड त्वरित लागणे दुरापास्त होते.

विविध आयोग व समित्यांच्या शिफारशींनंतर सोली सोराबजी यांच्या नेतृत्वाखालील पोलिस कायदा मसुदा समितीने प्रत्येक राज्यात राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण स्थापण्याची तरतूद २००६मध्ये आदर्श पोलिस कायद्यात केली. ही तरतूद तसेच विविध अहवालांच्या आधारे सर्वोच्च न्यायालयानेही २००६मध्येच २२ सप्टेंबर रोजी प्रकाश सिंग व अन्य विरुद्ध केंद्र सरकार या प्रकरणात एक ऐतिहासिक निकाल दिला. त्यात विविध प्रकारचे आदेश देशातील सर्व राज्यांना दिले होते. त्यातील सहाव्या क्रमांकाच्या आदेशात पोलिस विभागात कायदा व सुव्यवस्था आणि गुन्ह्यांचा तपास असे दोन वेगळे विभाग असावेत, असे निर्देश होते. तसेच नागरिकांच्या पोलिसांविरुद्धच्या तक्रारींसाठी स्वतंत्र प्राधिकरण करावे, असे निर्देश होते. त्याचवेळी यासंदर्भात प्रत्येक राज्याकडून स्वतंत्र कायदा होईपर्यंत आमच्या निर्देशांचे पालन करावे, असेही आदेशात स्पष्ट केले होते. पोलिसांनी आपले कर्तव्य जबाबदारीपूर्वक व कायद्याला अनुसरून पार पाडावे आणि प्रत्येक कृती कायद्याला धरूनच करावी, हा उद्देश त्यामागे होता. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश म्हणजे एकप्रकारे कायदाच असतो. परंतु, तरीही देशातील बहुतेक राज्यांनी त्याकडे गांभीर्याने पाहिलेच नाही. त्यामुळे त्या आदेशांचे पालनच झाले नाही. महाराष्ट्रही त्याला अपवाद नव्हता. राज्याच्या गृह विभागाने २५ जुलै २००८ रोजी एक जीआर काढून राज्य व जिल्हास्तरीय पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला. परंतु, प्रत्यक्षात आपल्या त्या निर्णयाची अंमलबजावणीच केली नाही. अशीच अनेक वर्षे गेल्यानंतर या प्रश्नाच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात २०१३मध्ये एक जनहित याचिका आली. तेव्हा ही प्रस्तावित प्राधिकरणे आम्ही सहा महिन्यांत कार्यान्वित करू, अशी ग्वाही देऊन जनहित याचिका निकाली काढण्याची विनंती महाराष्ट्र सरकारने केली. त्यानुसार, आदेश काढून उच्च न्यायालयाने १२ जून २०१४ रोजी ती याचिका निकाली काढली. त्यानंतर राज्य सरकारने प्राधिकरणांच्या स्थापनेसाठी २५ जून २०१४ रोजी महाराष्ट्र पोलिस कायद्यात सुधारणा केली खरी, मात्र प्रत्यक्षात त्यानुसार प्राधिकरणे अस्तित्वातच आली नाहीत. नंतर आमच्या २०१४च्या एका फौजदारी रिट याचिकेच्या निमित्ताने हा विषय पुन्हा एकदा उच्च न्यायालयासमोर आला. तेव्हा, सर्वोच्च न्यायालयाने दहा वर्षांपूर्वीच आदेश दिलेले असताना आणि त्यानुसार राज्याने आधी जीआर काढून व नंतर सुधारित कायद्यात तरतूद करूनही प्राधिकरणांची स्थापनाच झाली नसल्याबद्दल उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. वारंवार वेळकाढूपणा झाल्याने उच्च न्यायालयाने अनेकदा सरकारची व सरकारी अधिकाऱ्यांची खरडपट्टीही काढली. अखेर २३ मे २०१५ रोजी राज्य सरकारने उच्च न्यायालयाचे ‌निवृत्त न्यायमूर्ती ए. व्ही. पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय प्राधिकरणाची स्थापना केली. परंतु, त्यानंतरही जवळपास दीड वर्ष हे प्राधिकरण प्रत्यक्षात कार्यान्वित होऊ शकले नाही. त्याबद्दल सरकारकडून विविध अडचणींचा पाढा न्यायालयासमोर वाचण्यात आला. अखेर उच्च न्यायालयाला सरकारच्या तीन बड्या अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश काढावे लागले. 'आमच्यासमोर पोलिसांविरुद्धच्या तक्रारींविषयीची अनेक प्रकरणे येत असतात, तुम्ही प्राधिकरण लवकर स्थापन केले तर ही प्रकरणे त्या प्राधिकरणाकडे जाऊन त्यांचा लवकर निपटारा होईल. तरीही चालढकल का होते', अशी नाराजी उच्च न्यायालयाने व्यक्त केली. त्यानंतर, आता मुंबईतील राज्यस्तरीय प्राधिकरण काही दिवसांतच कार्यान्वित होईल. नाशिक, नागपूर व औरंगाबाद या तीन विभागीय प्राधिकरणांसाठी कार्यालयाची जागा निश्चित केली असून पुणे, अमरावती व नवी मुंबई (कोकणसाठी) या तीन उर्वरित विभागीय प्राधिकरणांसाठी जागा शोधण्याचे निर्देश संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती सरकारतर्फे प्रभारी महाधिवक्ता रोहित देव यांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयाला दिली. त्यामुळे आता किमान मुंबईतील राज्यस्तरीय प्राधिकरण लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.

(शब्दांकन : रमेश खोकराळे)

तक्रारी कशासंदर्भात करता येतील?

पोलिसांकडून कोणतेही गंभीर गैरकृत्य वा बेकायदा कृत्य झाले तर त्याविरुद्ध नागरिकांना या प्राधिकरणाकडे तक्रार करता येईल. कोणत्याही पोलिसाविरुद्ध गंभीर आरोप किंवा तक्रार आली तर प्राधिकरण स्वतःहून त्याविषयी चौकशी करू शकते. अशी प्रकरणे सरकारकडून प्राधिकरणाकडे सोपवली जाऊ शकतात. त्याचबरोबर पीडित व्यक्ती अथवा त्यांच्यावतीने कुटुंबीय किंवा साथीदाराकडून, एखाद्या प्रत्यक्षदर्शीकडून, पोलिस विभाग किंवा राष्ट्रीय वा राज्य मानवाधिकार आयोगासारख्या विविध मंचांकडूनही प्राधिकरणासमोर तक्रार मांडली जाऊ शकते. चौकशीत पोलिसाने गैरकृत्य केल्याचे निष्पन्न झाले तर प्राधिकरण संबंधित पोलिसाविरुद्ध विभागीय शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करू शकते. कायद्याचे उल्लंघन करून गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले तर त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची शिफारस करू शकते. प्रसंगी पीडित व्यक्तीला नुकसानभरपाई देण्याची शिफारसही राज्य सरकारला करू शकते. तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी संबंधित साक्षीदारांना बोलावण्याचे अधिकार दिवाणी न्यायालयाप्रमाणे या प्राधिकरणालाही असतील. तसेच पुरावे म्हणून सरकारी कागदपत्रे मिळवणे, प्रतिज्ञापत्रावर पुरावे गोळा करणे आदी अधिकारही प्राधिकरणाला असतील. आवश्यकता भासल्यास तक्रारदाराला संरक्षण देण्याचे निर्देशही प्राधिकरण सरकारला देऊ शकते. प्राधिकरणाच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात मागता येईल.

कुठे असेल हे प्राधिकरण?

दक्षिण मुंबईतील महर्षी कर्वे रोडवरील कूपरेज एमटीएनएल टेलिफोन एक्स्चेंज इमारतीत चौथ्या मजल्यावर पाच हजार ९३० चौरस फुटांच्या आवारात महाराष्ट्र पोलिस तक्रार प्राधिकरणाचे कार्यालय असेल. यासाठी राज्य सरकारने एमटीएनएलची ही जागा भाड्याने घेतली आहे.

माजी न्यायमूर्ती ए. व्ही. पोतदार यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत

माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक पी. के. जैन,

माजी सिडको व्यवस्थापकीय संचालक आर. आर. सोनकुसरे,

माजी सनदी अधिकारी रामा राव व

समाजातील ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून उमाकांत मिटकर हे सदस्य असतील.


No comments:

Post a Comment