Friday, 31 March 2017

लेख क्र. (१) _ ”माझे घर आणि गृहकर्ज”

ग्राहक पंचायत महाराष्ट्र

ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्र, पुणे
“ग्राहक जागरण आणि प्रबोधन” अभियान

”माझे घर आणि गृहकर्ज”

लेख क्र. (१)

ग्राहक चळवळीशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या जोडलेल्या  सर्व सहोदारांना जागतिक  ग्राहक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

२.   मध्यंतरी आपल्याच काही सदस्यांनी “घर तसेच गृहकर्ज” घेतांना किमान काय काळजी घेतली जावी ह्या विषयी मार्गदर्शन करण्याची  विनंती आपल्याच एका ब्लॉगवर केली होती. “स्वतःचे घर” आणि त्यासाठी अपरिहार्य ठरणारे “गृहकर्ज” ह्या दोन्हीही गोष्टी सर्वांच्याच जिव्हाळ्याच्या असल्याने, तसेच “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” च्या कार्यकारिणीने देखील ह्याविषयी विनंती वजा आग्रह धरल्याने “जागतिक ग्राहक दिनाचे” औचित्य साधून ह्या विषयावर पुढील काही दिवसांसाठी  एक संपादित लेखमाला सुरु करीत आहे. ह्या लेखमालेचा उद्देश हा “कायदेशीर सल्ला” असा नसून “ग्राहकांची सर्वसाधारण जागृती आणि प्रबोधन” असा आहे. ज्या ठिकाणी कायद्याच्या क्लिष्ट गोष्टी असतील तेथे “कायद्यातील तज्ञ लोकांचे मार्गदर्शन” ह्यास पर्याय नाही. परंतु, सर्वसाधारणपणे नित्य नेमाने ज्या गोष्टींविषयी सामान्य ग्राहकांचे मनात एक प्रकारचे भय, अज्ञान किंवा अनिश्चितता असते त्याविषयी हि संपादित लेखमाला निश्चितच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. अर्थात, हा गोवर्धन उचलण्यासाठी अनेकांचा हातभार हा ह्यातील अविभाज्य भाग आहे. त्यानुसार ह्यावर विचारमंथन आणि विचारांची देवाण-घेवाण हा देखील प्रबोधनाचाच एक मार्ग ठरणार आहे.

३.   हि संपादित स्वरूपाची लेखमाला लिहित असतांना जे  विविध कायदे, दस्तावेज ह्यांचा उपयोग / मदत किंवा  सहकार्य घेण्याचा मानस आहे त्याविषयी देखील सुरवातीस कल्पना देऊ इच्छितो – त्यात Contract Act, Registration Act, Transfer of Property Act, CERSAI Act, Indian Stamp Act, Mumbai Stamp Act, Company Act,  Societies Act, MOFA, RERA आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा इ., तसेच  संबंधित  कायद्यातील तरतुदी, विविध प्रश्नांवर विविध वकिलांनी विविध वृत्तपत्रातून केलेले मार्गदर्शन, ह्या विषयाशी संबंधित तज्ञ आणि जाणकारांनी लिहिलेले वृत्तपत्रीय लेख, विविध  जिल्हा ग्राहक मंच, राज्य / राष्ट्रीय आयोग ह्यांचे विविध निवाडे इ. उपलब्ध गोष्टींचा सजगपणे विचार आणि आधार घेण्याचा मानस आहे. ह्या सर्व प्रयत्नात चळवळीशि संबंधित सहोदारांची साथ आणि प्रतिसाद निश्चितच हे शिवधनुष्य पेलण्यास मला मदत करील ह्याविषयी मला पूर्ण विश्वास आहे.

४.   ह्या अभियानांतर्गत सप्ताहातील एक  दिवस (बुधवार)  ह्या लेखमालेअंतर्गत लिहिण्याचा मानस आहे. ह्यासाठी  ग्राहकतीर्थ  मा.  नानांचे आशीर्वाद असल्याशिवाय हे शिवधनुष्य पेलणे केवळ अशक्य आहे.  शेवटी – “देणाराचे हात हजारो दुबळी माझी झोळी” हे बाबूजी (माननीय सुधीर फडके) ह्यांच्या एका गाण्यातील ओळीचे स्मरण करून थांबतो.


दि. १५.०३.२०१५                               अनिल जोशी
                                          केंद्रप्रमुख
                                  ग्राहक मार्गदर्शन सेवा केन्द्र, पुणे.  

No comments:

Post a Comment