Saturday, 11 February 2017

ग्राहकाला सदोष बूट बदलून देण्याचे ग्राहक न्यायालयाचे आदेश

ग्राहकाला सदोष बूट बदलून देण्याचे ग्राहक न्यायालयाचे आदेशधुळे :
नामांकीत कंपनीचे सदोष बूट ग्राहकाला संबंधित कंपनी आणि विक्रेत्याने बदलवून द्यावेत, असे आदेश जिल्हा ग्राहक न्यायालयाने दिले आहेत.तालुक्यातील हेंद्रूण येथील अनिलकुमार रामसिंग ठाकरे यांनी धुळे येथील युनायटेड फुट वेअर यांच्याकडून वुडलॅण्ड कपंनीचे बूट ३१00 रुपयांना खरेदी केले होते. हे बूट घातल्यावर काही दिवसातच ठाकरे यांच्या पायांना त्रास होऊ लागला. पायांना खाज येणे, पाय सुजणे असा त्रास त्यांना जाणवू लागला. आपण वापरीत असलेल्या बुटांमुळे हा त्रास होत असल्याची खात्री पटल्यावर त्यांनी त्याबाबत विक्रेता युनायटेड फुटवेअर यांच्याकडे तक्रार केली व बूट बदलवून देण्याची मागणी केली.सुरुवातीला विक्रेत्याने दाद दिली नाही. ठाकरे यांनी बराच तगादा लावल्यानंतर विक्रेत्याने बूट स्वत:कडे जमा करुन घेतले आणि कंपनीकडे पाठवितो असे सांगितले. मात्र, सहा महिने उलटूनही त्यांनी बूट बदलून दिले नाहीत. दरम्यानच्या काळात ठाकरे यांनी अनेकदा पाठपुरावा केला. विक्रेत्याला लेखी पत्रही दिले. त्यानंतरही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. अखेर ठाकरे यांनी ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली. त्यात त्यांनी वकील न लावता स्वत: बाजू मांडली. विक्रेता आणि वुडलॅण्ड कंपनीकडे केलेल्या तक्रारीच्या प्रती, बुटांचे देयक, विक्रेत्याकडे बूट जमा केल्याची पावती त्यांनी पुरावा म्हणून दाखल केली.हा पुरावा ग्राह्य मानून वीणा दाणी आणि संजय जोशी यांच्या पीठाने युनायटेड फुट वेअर आणि वुडलँड कंपनीने ग्राहकाला ३0 दिवसांच्या आत बूट बदलवून द्यावेत किंवा बुटांची किंमत ३१00 रुपये परत करावी, असे आदेश दिले. याची अंमलबजावणी मुदतीत न केल्यास यांना द.सा.द.शे.६ टक्केप्रमाणे व्याज द्यावे लागेल असेही न्यायालयाने बजाविले आहे. याचबरोबर विक्रेता आणि कंपनीने ग्राहकाला शारीरिक, मानसिक त्रास आणि तक्रारीच्या खर्चापोटी २ हजार रुपये भरपाई द्यावी, असेही निकालात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment