भारतीय ग्राहक चळवळीचे चाणक्य ! बिंदूमाधव जोशी - Grahak Margdarshan

STAY CONNECTED

भारतीय ग्राहक चळवळीचे चाणक्य ! बिंदूमाधव जोशी

(स्व.बिंदुमाधव जोशी प्रथम वर्ष स्मृती दिनानिमित्त लेख 10 मे 2016)

भारतीय ग्राहक चळवळीचे चाणक्य ! बिंदूमाधव जोशी
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सर्वेसर्वा मा. बिंदुमाधव जोशी यांचा जन्म पुण्यात एका उच्चविद्याविभुषित, प्रकांड पंडित, वेदांत व योगशास्त्राचे गाढे असणाऱ्या आदरणीय बटुकभैरव जोशी यांच्या घरात दिनांक 25 सप्टेंबर 1931 या शुभदिनी झाला. बालपणापासूनच कुशाग्र बुध्दिमत्ता लाभलेला बिंदुमाधव हा भारतीय ग्राहक चळवळीचा प्रणेता होईल असे कोणालाही त्यावेळी वाटले नव्हते. परंतू आपल्या चिंतनशील बुध्दिमत्तेच्या आणि वत्कृत्वाच्या जोरावर त्यांनी केलेलं काम आज साऱ्यांसमोर आहे.
बिंदुमाधवांना, आपण समाजाच्या हिताचे असे काहीतरी भव्यदिव्य काम करावे अशी त्यांची इच्छा होती. त्यातूनच दादरा नगर हवेलीचे आंदोलन असो की, कुठलेही सामाजिक समस्यांवरचे केलेले आंदोलन असो त्यात त्यांचा सहभाग राहीलेला आहे. यामागे समाजाबद्दलची कणव व त्यासाठी केलेले चिंतन आहे हे लक्षात येते. त्यातच त्यांचा रा.स्व.संघाशी संबंध आल्याने त्यांच्या सामाजिक जाणीवा रूंदावल्या, अंगी शिस्तबध्दता आली. झोकून देऊन काम करण्याची ताकद, संघप्रचारकासारख्या अत्यंत पवित्र अशा पदाला आपल्या कामाच्या माध्यमातून त्यांनी प्रतिष्ठीत केले.
आज पुणे शहराने संपूर्ण देशाला राजकीय, सामाजिक शैक्षणिक  व क्रांतीचा वारसा दिलेला आहे. आणि म्हणूनच 1975 मध्ये ग्राहक पंचायतीच्या उद्घाटन सोहोळ्यात न्यायमूर्ती करिम छागला यांनी जे पुण्यात स्विकारले जाते ते भविष्यात देशात स्विकारले जाईल असे जाहीर भाषणात काढलेले उद्गार बरच काही सांगून जातात. अशा या पुणे शहरात भारताच्या ग्राहक चळवळीची गंगोत्री 6 सप्टेंबर 1974 रोजी ज्येष्ठ गायक व संगीतकार स्व. सुधीर फडके यांचे पंचवटी या निवासस्थानी प्रभू रामचंद्राच्या व वेदांतसूर्य स्वामी विवेकानंद यांच्या आशिर्वादाने प्रवाहीत झाली.
ग्राहक पंचायतीच्या कामाला लोकनायक जयप्रकाश नारायणांचा आशिर्वाद  लाभावा यासाठी त्यांची भेट घेउन त्यावेळी त्यांना ग्राहकांची होणारी फसवणूक, ग्राहक चळवळीचे महत्व, त्यासाठी ग्राहक पंचायत करित असलेले कार्य याची माहिती दिली गेली. व या कार्याच्या यशस्वीतेसाठी त्यांनी आशिर्वाद द्यावा असे सांगीतले गेले. तेव्हा जयप्रकाश नारायण अत्यंत भारावून म्हणाले की, अरे ! तुझ्या सारखे 100 तरूण तु एकत्र करशील तर स्वातंत्र्यानंतर या देशाला नव निर्माणाच्या चळवळीची आवश्यकता तुम्ही तरूण मुलेच पुरी करू शकता. देश तुमची वाट पाहात आहे. माझा तुम्हाला आशिर्वाद आहे. जयप्रकाशजींचा आशिर्वादाने प्रोत्साहीत होऊन सारे कार्यकर्ते कामाला लागले.
याचवेळी एक घटना अशी घडली की, त्यामुळे ग्राहक पंचायतीचे महत्व विदीत झाले. ऐन सणासुदीच्या काळात व्यापारी वर्गाने जीवनावश्यक मालाची कृत्रिम टंचाई निर्माण करून चढ्या भावाने विक्री करू लागले. त्या विरूध्द ग्राहक पंचायतीने प्रखर पण शांततापूर्ण असे आंदोलन उभे केले. प्रथमच ग्राहक संघटीत झाल्याने व्यापारीवर्ग भयभीत झाले. परिणामी ग्राहक पंचायतीच्या विरोधात त्यांनी कांगावा सुरू करून ही चळवळ व्यापाऱ्यांच्या विरोधात आहे असा अपप्रचार सुरू केला. त्यावेळी बिंदुमाधवांनी आपल्या भाषणातून ग्राहक पंचायत ही कोणाही व्यापाऱ्यांविरूध्द  वा कोणाही उद्योजकांविरूध्द नसून ती अनुचित व्यवहार व व्यापारी प्रथांच्या विरूध्द आहे. त्यामुळे प्रामाणिकांना घाबरण्याचे काहीही कारण नाही. असे त्यांनी ठणकावून सांगीतले. ह्याचा खूप मोठा परिणाम झाला. अनेक प्रामाणिक व्यापारी ग्राहक पंचायतीच्या संपर्कात आले. तेही काम करू लागले. हळू हळू ही संख्या वाढू लागली. परिणामी ही चळवळ पुण्यात चांगलीच फोफावली. तीचे पडसाद आता पुण्याबाहेरही पडू लागले.
आता ही चळवळ देशव्यापी झाली पाहीजे, जिल्ह्यात, तालुक्यात, गावपातळीवर नेऊन संघटीत ग्राहकांचा एक दबाव गट तयार करून प्रशासनाला हलवुन ते ग्राहकाभिमुख करण्याच्या आवश्यकतेवर त्यांचा भर होता. तसे झाले तर भारतीय अर्थ व्यवस्थेचं शुध्दिकरण होऊ शकेल या विचाराने प्रेरीत होऊन त्या दिशेने त्यांचे प्रयत्नही सुरू झाले. पुण्याच्या बाहेर जाऊन काम करणारे कार्यकर्तेही तयार झाले. ते ठिकठिकाणी जाऊ लागले. ग्राहक पंचायतीचा विचार मांडू लागले. तो विचार साऱ्या महाराष्ट्राने स्विकारला. सर्व जिल्ह्यात काम सुरू झाले. हजारो कार्यकर्ते उभे राहीले. काहीही अपेक्षा न ठेवता, स्वत:च्या खिशाला चाट देऊन काम करू लागले. ग्राहकही पुढे येऊन आपल्यावरच्या अन्यायाला वाचा फोडू लागले.
बिंदुमाधव जोशींनी महाराष्ट्राचा प्रवास आखला. त्यांचा झंझावात सुरू झाला. त्यांच्या विचारांना आता धार चढलेली होती. त्यांच्या जिभेवर सरस्वती नाचत होती. आपल्या भाषणात ते सांगू लागले ग्राहक पंचायत ही संघटना स्वस्त वस्तू मिळवून देणारी चळवळ नाही. तर ग्राहक चळवळीला संघटीत ग्राहकांचे विराट शक्ति प्रदर्शन घडवायचे असून त्याद्वारे ग्राहकशोषीत अर्थव्यवस्थेचं शुध्दिकरण करावयाचे आहे. ग्राहक पंचायत ही व्यवस्था सुधारणारी चळवळ आहे. यातून ग्राहक पंचायतीला नेमके कोणते काम करावयाचे आहे हे साऱ्यांना समजले. याकडे देशातील समाजधुरीणांचे लक्ष वेधले गेले.
ग्राहक पंचायत ही चार पायांवर उभी आहे ते चार पाय म्हणजे 1. ग्राहक संघटन 2. ग्राहक प्रबोधन 3. रचनात्मक कार्य 4. संघर्षात्मक कार्यक्रम असे असुन कार्यकर्त्यांनी हे काम करित असतांना नितीमुल्य, श्रमप्रतिष्ठा, विश्वस्तभावना, स्वदेशी निष्ठा व देशाशी बांधिलकी ठेवली पाहीजे यावर बिंदुमाधवांचा कटाक्ष होता. असे संघटीत ग्राहकच अर्थव्यवहारावर अंकुश ठेवू शकतील यावर त्यांचा विश्वास होता.
ग्राहक पंचायतीच्या कामाची दखल शासनाने देखील घेतली. ग्राहक पंचायतीने तयार केलेला ग्राहक संरक्षण कायदा 1986 सारखा अत्यंत महत्वाचा कायदा पारित करण्यात आला. त्याचे श्रेय अर्थात बिंदुमाधवांनाच जाते. त्यांच्या या कार्याची नोंद घेवून महाराष्ट्र शासनाने ग्राहक कल्याण उच्चाधिकार समिती स्थापन करून त्याच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली गेली. हे पद कॅबिनेट दर्जाचं होते. या पदावर गेल्यावर त्यांनी ग्राहक चळवळीच्या वाढीसाठी केलेलं काम हे लक्षणीय असं आहे. त्यामाध्यमातून त्यांनी प्रशासनाला ग्राहकाभिमुख बनवलं. संवाद आणि समन्वयाने सामान्य माणसांचे प्रश्न सोडवले जातील अशी व्यवस्था जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या ग्राहक संरक्षण कक्षाच्या माध्यमातून उभी केली.
ग्राहक हिताचे आणि कल्याणाचे अनेक उपक्रम कोणत्याही राजकीय, पक्षीय राजकारण न आणता शासन ग्राहक चळवळीच्या पाठीशी  कसे उभे राहू शकते हे दाखवून दिले. तर कार्यकर्त्यांना बहि:श्याल व्याख्याते बनवून त्यांना महाराष्ट्रातील शाळा कॉलेजेसमध्ये पाठवून विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक जागृती घडवली. तर दुसरीकडे ग्राहक न्यायमंचाची अवस्था ही दिवानी न्यायालयासारखी झालेली होती. 90 दिवसात मिळणारा न्याय हा ग्राहकांसाठी कोसो दूर होता. यासाठी न्यायमंच्याच्या अध्यक्षांना व सदस्यांना प्रशिक्षणवर्गाच्या माध्यमातून त्यांच्यात समाजाप्रती असणारी बांधिलकी लक्षात आणून दिली.
आज ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेत ग्राहक ही तीसरी शक्ती म्हणून उदयास आलेली आहे. त्याचे श्रेय हे कुठलीही निवडणूक न लढवलेल्या परंतू महाराष्ट्र राज्याच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाचा रथ विजयी मार्गावरून नेणाऱ्या बिंदुमाधव जोशींनाच आहे याबद्दल कोणीच शंका घेऊ शकणार नाही.
आज भारताला स्वातंत्र्य मिळून 65 वर्षे झालीत तर ग्राहक पंचायतीला 40 वर्षे झालीत. या 40 वर्षात कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध न ठेवता, सरकारी अनुदान न घेता, तोडफोड, मोर्चे, घेराव, निदर्शने, उपोषने न करता ही चळवळ यशस्वी झालेली आहे. म्हणूनच भारतीय ग्राहक चळवळीचा आद्य प्रणेता ( pioneer of Indian consumer movment ) असं भारत सरकारच्या वतीने बिंदुमाधव जोशी यांना मार्च 2012 या दिवशी सन्मानित केलं गेलं.
आज बिंदुमाधव जोशी आपल्यातून जाऊन बरोबर 1 वर्ष पुर्ण होत आहे. ते आज शरीररुपाने जरी आपल्यात नसले तरी ग्राहक पंचायतीच्या लाखो कार्यकर्त्यांच्या कामाच्या माध्यमातून ते जिवंत आहेत. आपल्या अथक परिश्रमाने त्यांनी उभी केलेली ग्राहक पंचायत त्यांनी दाखवलेल्या मार्गाने पुढे नेऊन संघटीत ग्राहकांच्या माध्यमातून शोषित अर्थव्यवस्थेचं शुध्दिकरण करित राहाणे  हीच त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने श्रध्दांजली ठरणार आहे. 


-विजय मोहरीर
नाशिक विभागीय सह संघटन मंत्री
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, महाराष्ट्र